अखेर एका साधारण दिवशी मी तिथे पोहोचले. मिठी मारायला…त्याच सोनचाफ्याच्या झाडाला. आठवते आहे का ती गोष्ट? गोष्टीतले पक्षी, ते घरटं, तो सोनचाफा, तो विशारी साप? नसेलच आठवत तर या ब्लाॅग वरची “गोष्ट” एकदा वाचा आणि मग या इथे म्हणजे तुम्हाला कळेल मी कुठे आहे ते.

मी पोहोचले आहे त्या सोनचाफ्याच्या झाडापाशी.

तुला बघते आहे मी. काहीच बदललेलं नाही आहे. ते पक्षी नाही आहेत. ते घरटं शोधून सापडत नाही आहे. तो सापही दिसत नाही आहे. गळून पडलेला सोनचाफाही गायब झाला आहे.

येऊ मी तुझ्या जवळ… ये… मिठी मारते तुला…

हो हो… किती रडशील… बरं वाटतं आहे का आता तुला? हम्म्… बोल… सांग मला नेमकं काय झालं आहे ते… बोल… बोल माझ्याशी… हे बघ तू बोलला नाहीस ना, तर मला कसं समजेल… आता काय मी झाड होऊ तुझ्यासाठी? बघ, मी आले आहे ना…

झाड काही केल्या बोलतच नव्हतं माझ्याशी…

शेवटी मी त्याच्या खाली बसून राहिले…
तेवढ्यात माझं लक्ष एका खारूताईकडे गेलं. सर सर सर झाडावरून खाली उतरली आणि परत वर चढली. चढताना माझ्या एवढ्या जवळून गेली की तिची लुसलुशीत शेपटी माझ्या गालाला शिवून गेली. ती एवढ्यावरच थांबली नाही. तिनं तिच्या मिचमिच्या डोळ्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि भरा भरा चढली… मी तिला बघायला मान वर केली आणि म्हटलं, इवलीशी शेपटी अन् इवलासा जीव पण हिम्मत केवढी तुझ्यात!

जणू तिच्या छोट्याश्या चेहऱ्यावर माझ्या एवढं स्मित फुललं… सर सर सर खाली आली… आणि म्हणाली, चल, खेळूया पकडा पकडी. माझ्या चेहऱ्यावर तिच्या एवढच हसू फुटलं…
खूप खेळलो पकडा पकडी… शेवटी दमवलं मी त्या खारूताईला…
एक सांगू? मला ना असं वाटतं आहे की ती खारूताई म्हणजे मीच आहे. नाही म्हणजे, मला कोणी लाडानी ताई अशी हाक मारली की मला खारूताई असचं ऐकू येतं… माझंही श्री रामावर प्रेम आहे. रामायणात जर मी असते तर मी खारूताईचा वाटा दिला असता माझ्या रामाला. पाठीवरून मायेचा हात फिरला असता मग. अरेच्च्या, या खारूताईच्या नादात मी कोणाचा पाठपुरावा करायला आले आहे हे लक्षातच नाही राहिलं…
माझी पाठ दमून झाडाला टेकली होती. मी झाडाकडे बघितलं. म्हटलं, राजा माझ्या लाडक्या बोल रे काहीतरी. परत एकदा मिठी मारू का तुला?

पण झाड काही बोलायला तयार नव्हतं.

तेवढ्यात खारूताई माझ्या कानात गुदगुल्या केल्यागत काहीतरी बोलली आणि माझ्यावरून खाली उतरली आणि सर सर सर तिकडे निघून गेली. मी पोट धरून हसायला लागले. हो हो सांगते… कुठे आणि कशासाठी गेली आहे ते…
तिला प्रश्न पडला आहे. ती जर खारूताई असेल तर तिच्याकरता एखादा खारूदादा पण असायला हवा ना. ती त्याच्याच शोधात झाडावरून खाली उतरली आहे.

पळ खारूताई पळ. मिळेल तुला हवं ते. आणि मग भेट मला पुन्हा एकदा…
तिच्या मिचमिच्या डोळ्यांनी माझ्याकडे वळून बघितलं आणि ती निघून गेली…

आता मी होते आणि हे सोनचाफ्याचं झाड होतं. संध्याकाळ सरायला लागली…
त्या रात्री झाडानं मला काही सांगितलं का, की रात्र तशीच सरली?

हे मला तुम्हाला सांगायचं आहे, पण.
पाऊस पडतोय.
मला घरी निघायला हवं.
भेटूच.

——- रानी

Ranee's Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *