फुलपाखरू

(फुलपाखरू वाचण्या अगोदर या ब्लॉगवरील “गोष्ट” मग “खारूताई” वाचा आणि मग इथे या. म्हणजे तुम्हाला कळेल या गोष्टीत मी नेमकी कुठे आहे ते.)

दिवस साधारणच होता. माझ्या डोळ्यांना एका फुलपाखरानी आकर्षित केलं. लाल, गुलाबी, निळा आणि हिरव्या गडद रंगांनी तो रंगलेला छोटासा जादूगारच जणू. वेळ, काळ, वय विसरून माझी पावलं त्याच्या मागे धावत सुटली. तो मला कुठेतरी नेत होता. हे ठिकाण ओळखीचं वाटलं कारण जंगल सुरू झालं होतं. तिथली झाडं हिरवीगार होती. पण या जंगलात सुगंध दरवळत होता फुलांचा. माझे मन ओळखीच्या ठिकाणी असल्याचे संकेत द्यायला लागले. तेवढ्यात माझी पावलं थबकली ती एका झाडा खाली. हे झाड तेच होतं. गोष्टीतलं. मी डोळे भरून त्या झाडाकडे पाहिलं. हे झाड सोनचाफ्याच्या सोनफुलांनी लदबदलेलं होतं. प्रत्येक फांदी बहरलेली होती. एका फांदीवर एक घरटं होतं त्यात दोन सुंदर पक्षी होते. तर दुसऱ्या फांदीवर एक विषारी साप विळखा घालून शांतपणे निजला होता. खारूताई आणि खारूदादाही एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर खेळत होते. मी पाहत होते हे सगळं माझ्या डोळ्यांनी. डोळ्यातून अश्रु वाहायला लागले. ते माझे होते. हो माझेच होते बहुतेक. मी झाडाला स्पर्श केला. दुसऱ्याच क्षणी त्यानी त्याच्या सगळ्या फुलांचा वर्षाव माझ्यावर केला. जमीनीवर फुलांचा सडा पडला. मी त्याला कडकडून मिठी मारली. मिठी मारता क्षणी जमीनीवरचा सोनचाफा गायब झाला. ते पक्षी, तो साप, ती खारूताई, तो खारूदादा सगळे नाहीसे झाले. माझे अश्रूही वाळले आणि मला खाडकन जाग आली. सकाळ झाली होती.

मी होते त्याच सोनचाफ्याच्या झाडा खाली. होय. मी घरी गेलेच नाही. इथेच निजून राहिले ह्या झाडाखाली. त्या रात्री ह्या झाडानी मला काय सांगितलं हे गोष्टीत सांगायचं राहूनच गेलं, नाही का? तहान. तहान…

पाऊस पडून गेला आहे पण तहान काही भागत नाही. माझी पावलं नदीच्या दिशेला वळली. पावलंच ती. नेत होती मला काठाशी. तहान खूप लागली होती आणि नदी खळ खळ वाहत होती. मी पाण्याने ओठ ओले केले आणि नदीने मला चिंब भिजवले. नदीचा स्पर्श होताच माझ्या डोळ्यातून ती खोल खोल वाहू लागली. माझ्या हातांच्या मी फांद्या केल्या आणि मीच मला मिठी मारली. आता माझ्या रडण्याचा आवाज जंगलात पसरला असावा. काही क्षण असेच गेले. मी मी नव्हते. ना अश्रू नदीचे होते. ना नदीचा आवाज होता. आवाज होता तो प्रतिसाद देणारा. दमलेला पण खरा. शिणलेला पण माझ्या सारखा. माझ्या समोर एक वाघीण होती जंगलातली. तेजस्वी डोळे आणि आकर्षक बांधा. पण तिच्या शरीरावर जखमा होत्या. काही जुन्या तर काही नुकत्याच झालेल्या. काही जुन्या जखमांवर नवीन जखमा झालेल्या मी पाहिल्या. मोठा श्वास ती घेत होती पण धाप मला लागत होती. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. मग एकमेकींनी नदीत पाहिलं. माझं प्रतिबिंब हे तिचं होतं आणि तिचं प्रतिबिंब माझं. आम्ही एकमेकींना ओळखलं होतं. तितक्यात कुठूनतरी वाघाची डरकाळी कानावर पडली. तिनं टाहो फोडला. सैरभैर झाली. आक्राळ विक्राळ चेहरा केला. प्रचंड मोठ्या आवाजात तिनं डरकाळी फोडली. सुडानं ती पेटली होती. ती निघाली. तिला थांबवणं शक्य नव्हतंच. ती दृष्टीआड होई पर्यंत पाहत राहिले मी. मग मी डोळे बंद करून घेतले. आता माझी पावलं वेगानं पडायला लागली. हो. पडत होती माझी पावलं. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे, कधी सरळ तर कधी वाकडी. एखाद्या फुलपाखरासारखी. मी पोहोचले त्याच झाडापाशी. एकही क्षण न दवडता मी त्या झाडाला मिठी मारली, त्याचे चुंबन घेतले आणि त्याला सांगितले, “तू माझा आहेस. तुझ्यात मी आणि माझ्यात तू आहेस.” बस. हेच काय ते हवे होते झाडाला.

सोनचाफा बहरला. दोन सुंदर पक्ष्यांनी प्रेमानी घरटं बाधलं, खारूताई आणि खारूदादा माझ्या पाया भोवती ऊड्या मारू लागले. सापही बसला एकदम वरच्या फांदीवर. आणि ते फुलपाखरू? ते होतं ना माझ्या खांद्यावर.

त्या रात्री झाडानं मला काही सांगितलं… का रात्र तशीच सरली…. हे मला तुम्हाला सांगायची अजूनही गरज आहे?

आणि हो. या गोष्टीतली ‘मी’ नेमकी कोण होते… ते पक्षी, ते प्राणी, ती नदी, आजूबाजूच्या झाडांमधलं एक झाड, का ते सोनचाफ्याचं झाड, का तो सोनचाफा, का ते फुलपाखरू? का जंगल? का ते क्षण जे होते आणि नव्हते ही.

खरं सांगते…. काही गोष्टी या गोष्टीतच राहिलेल्या बऱ्या. नाही का?

——- रानी

Ranee's Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *